प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी निवडणूक संपताच राजकीय पदाधिकाऱ्यांची सर्वसामान्य कार्यक्रमातील उपस्थिती अचानक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः दशक्रिया विधी, अंत्यविधी किंवा सामाजिक दुःखातील कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती नगण्य प्रमाणात असल्याचे दिसून येते. निवडणुकीपूर्वी मतदारांच्या घरापर्यंत जाऊन समर्थन मागणारे, पायापडून विनंती करणारे अनेक राजकीय पुढारी आता निवडणूक संपल्याने “सध्या गरज नाही” अशा अविर्भावात वागत असल्याचे चित्र दिसत आहे. काही नेते तर खुलेआम “आम्ही सुखदुःखात हजेरी लावतो, कित्येक कार्यक्रमांना जातो, पण निवडणुकीत पैसे दिल्याशिवाय मतदार मतदानच करत नाहीत” अशी चर्चा करताना आढळत आहेत. मतांसाठी निवडणुकीत दाखवलेले प्रेम आणि निवडणूक झाल्यानंतर दिसणारी उदासीनता यामुळे मतदारांमध्ये राजकीय व्यवस्थेबद्दल नाराजी वाढत आहे.निवडणुकीतच नव्हे तर सर्वकाळ नागरिकांशी बांधिलकी ठेवण्याची अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.