प्रभात वृत्तसेवा नीरा – पुणे जिल्ह्यात जानेवारीत होणारी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. ही शर्यत किमान ४० देशांमध्ये थेट प्रक्षेपित होणार असल्याने सासवड आणि परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. स्पर्धेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असे मत पुण्याचे जिल्हाधिकरी जितेंद्र डूड्डी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकरी डूड्डी यांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ज्या ज्या गावातून ही सायकल स्पर्धा जाते, त्या गावातील स्थानिक लोकांशी त्यांनी संवाद साधला व सायकल स्पर्धेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील मधील ही आंतरराष्ट्रीय शर्यत क्रीडा, विकास आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम ठरणार आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला. नीरा येथे ग्रामस्थ व प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धेची माहिती लोकांना दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, मंडलाधिकारी बापुसाहेब देवकर, नीरेचे ग्राममहसूल अधिकारी मयूर पाटोळे, पिंपरे (खुर्द) चे ग्राममहसूल अधिकारी पल्लवी नरळे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, पिंपरें खुर्दचे सरपंच राजेंद्र थोपटे, ग्रामपंचायत अधिकारी रमेश राऊत उपस्थित होते.