प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे याने स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट, मुलीला वाढदिवसाच्या पहिल्या व शेवटच्या शुभेच्छा तसेच आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट टाकून बेपत्ता झाला होता. तो सुखरूप घरी परतल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे (वय ३३, सध्या रा. ज्ञानमंजुळा सोसायटी, शिक्रापूर) याची ५ डिसेंबर रोजी यवत येथून शिक्रापूर येथे बदली झाली होती. मात्र, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे कार्यमुक्त न करता जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्याने केला होता. मुलगी आजारी असताना आणि तिचा वाढदिवस असतानाही सुट्टी मंजूर न केल्याने त्रस्त होऊन रणदिवे यांनी स्टेटसला ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे टाकून, पोलीस निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे सांगून ते बेपत्ता झाले.याबाबत बेपत्ता पोलीस नाईक निखिल रणदिवे यांचा भाऊ अक्षय कैलास रणदिवे (वय ३०) यांनी शिक्रापूर पोलिसात खबर दिली होती. त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आणि यवतसह शिक्रापूर पोलीस, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक निखिलचा शोध घेत होते. अखेर, ११ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेले पोलीस नाईक निखिल रणदिवे घरी परतले. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घरी जाऊन निखिलची भेट घेतली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी सांगितले की, निखिल रणदिवे नुकताच घरी परतला असल्याने दोन दिवसांनी त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जाईल.