प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – जिल्हा परिषद पंचवर्षिक निवडणूक कडूस चास गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहिरवाडीच्या लोकनियुक्त सरपंच वसुधा अंकुश राक्षे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे सादर केला.वसुधा अंकुश राक्षे यांना कडूस – चास गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेकडून त्यांना पाठिंबा मिळाला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शिवसेना पक्षाकडून त्यांना गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. वसुधा राक्षे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौडे यांच्याकडे बुधवारी (दि.२१) सादर केला. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरूण चांभारे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, श्रीभैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शेंडे यावेळी उपस्थित होते. “कडूस चास जिल्हा परिषद गटात मागील काही काळात भ्रष्टाचार आणि त्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ पाहता या अनिष्ट प्रवृतींना रोखण्यासाठी आणि स्वच्छ व पारदर्शक कारभार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदार संघातील अनागोंदी आणि गुंडगिरी संपवून महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटेल असा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहे.” – वसुधा अंकुश राक्षे, कडूस चास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार