इंदापूर : ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थापनाला नवी दिशा देणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखर (ता. इंदापूर) या संस्थेचे सचिव विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड–२०२५’ ने गौरविण्यात आले. महाविद्यालयातील सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली या कॅटेगरीमध्ये हा मानाचा पुरस्कार नेस्को, गोरेगाव (मुंबई) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शैक्षणिक कार्यातील सातत्य, प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य आणि गुणवत्तेचा ध्यास या गुणांची दखल घेत रणसिंग यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग व सहकार्य देणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे परिसरात समाधान व अभिनंदनाचा सूर आहे. स्टार एज्युकेशन अवॉर्ड्सच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व अग्रगण्य उपक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्था व संघटनांचा गौरव करण्यात येतो. अध्यापन प्रक्रियेचा पुनर्विचार, पुनर्परिभाषा करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करणाऱ्या उपक्रमांना या पुरस्कारांद्वारे प्रोत्साहन दिले जाते, अशी माहिती रणसिंग यांनी दिली. नवोपक्रम, संधींची निर्मिती आणि दर्जेदार शिक्षणाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या ग्रामीण भागातील संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा राष्ट्रीय सन्मान मिळाल्याने आगामी काळात अधिक जोमाने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहण्याचा निर्धार रणसिंग यांनी व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार विरबाला पाटील, विश्वस्त शंकरराव रणसिंग, कुलदीप हेगडे, राही रणसिंग, विश्वासराव रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, तावशी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव बागल, म्हसोबाचीवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी रणसिंग यांचे अभिनंदन केले.