प्रभात वृत्तसेवा नसरापूर – मौजे कामथडी येथील खुटवड वस्ती परिसरात (दि.6) संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात विमल नथु चव्हाण (वय 64, रा. उंबरे) यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दख्खन पठारसमोर हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पसार झाला असून राजगड पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी गणेश नधु चव्हाण (रा. उंबरे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास महामार्ग क्रॉस करून हॉटेल दख्खन पठारकडे येत होत्या. त्याचवेळी एका वाहनाने जोरात येत त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्या. अपघात झाल्यानंतर वाहनचालकाने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हा अपघात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.