प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, पुणे जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सुमारे ६.३ लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. ३) मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे.राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी गेल्या काही आठवड्यांपासून आपला प्रचार शिगेला नेला होता. आता उद्या होणाऱ्या मतदानातून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व निश्चित होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने बजावण्याचे आवाहन केले आहे. ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानासाठी सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया व नियम मतदान सकाळी साडेसातपासून सुरू, ईव्हीएम – निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर, मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅटची कागदी चिठ्ठी आता ड्रॉपबॉक्समध्ये जमा होणार नाही, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणतीही प्रचार सामग्री, निवडणूक बूथ किंवा जमावबंदी, मतदान केंद्राच्या आत मोबाइल फोन किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई आहे, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि रॅम्प यांसारख्या सुविधा असेल. रेशनकार्ड ओळख म्हणून अवैध रेशन कार्ड, शासकीय नसलेल्या संस्थांनी दिलेले कोणतेही ओळखपत्र, जन्म दाखला किंवा इतर सामान्य कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत.तर मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पारपत्र (Passport), वाहन चालक परवाना, उत्पन्न कर ओळखपत्र (PAN Card), केंद्र/राज्य सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, श्रम मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य, विमा स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज, संसदीय/विधानसभा/विधानपरिषद सदस्यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र ग्राह्य असेल. येथे होणार मतदान दौंड, चाकण, शिरूर, इंदापूर, सासवड, जेजुरी, भोर, आळंदी, जुन्नर, राजगुरूनगर, लोणावळा, तळेगाव दाभाडे या नगरपिरषदांकरिता तर मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर बारामती, उरुळीदेवाची-फुरसुंगी नगरपरिषदेसह तळेगाव, दौंडच्या काही प्रभागांचे मतदान प्रक्रियात्मक त्रुटी आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. या ठिकाणी दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.