प्रभात वृत्तसेवा वाघोली – प्रभाग क्रमांक 3 (विमाननगर-लोहगाव-वाघोली) हा आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच होणार, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत सहभागी होत समारोप सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदीप कंद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहगाव बस स्टॉप येथून सुरू झालेली ही पदयात्रा आझादनगर मार्गे जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराजवळ समारोपाला पोहोचली. समारोप सभेत मतदारांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि रामदास दत्तात्रय दाभाडे या चारही अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच तुकोबारायांचे नाव देण्यात येईल. तसेच लोहगाव परिसरातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करत असून, त्याला निश्चितच लवकर यश मिळेल. “विमाननगर, लोहगाव, सोमनाथनगर आणि वाघोली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे सर्व उमेदवार कटिबद्ध आहेत. नेतेमंडळी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरणारे काम आम्ही करून दाखवू. मतदारांनी मतदानाद्वारे काम करण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती.” – रामभाऊ दाभाडे, भाजप उमेदवार, प्रभाग क्रमांक 3