प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत माले (ता. मुळशी) येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, यामुळे मुळशी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींमधील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या प्रकल्पाची नियमित साफसफाई व देखभाल न झाल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याच्या टाक्यांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असून, पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी पावडर टाकण्याची यंत्रणा बंद अवस्थेत आढळून आली. तसेच झाडी-झुडपे वाढल्याने सापांचा वावर वाढला असून कर्मचार्यांनाही काम करताना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांपर्यंत दूषित पाणी पोहोचण्याची गंभीर शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पातून मुळशी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र योग्य शुद्धीकरण प्रक्रिया न राबविल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही योजना ग्रामपंचायतींकडून वसूल होणार्या पाणीपट्टीवर चालवली जाते. मात्र खर्च जास्त व वसुली कमी असल्याने देखभाल-दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यामध्ये वीज देयकांवरील खर्च सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली.माले ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन आधवडे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांसह पाहणी केली असता टाक्यांवर शेवाळ साचलेले, शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. “माले येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरवस्थेची माहिती मिळताच संबंधितांना तातडीने स्वच्छता व दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवार (दि. 8) रोजी हे काम करण्यात येणार आहे. या योजनेचे आयुष्य संपले असून खर्चाच्या तुलनेत वसुली होत नाही. सध्या ग्रामपंचायतींच्या मुद्रांक शुल्कातून योजना चालवली जात आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सौरऊर्जेवर आधारित नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे.” – अमित पाथरट, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग