प्रभात वृत्तसेवा पौड – महसूल अधिकार्यांच्या निलंबनाविरोधात राज्यभर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा तीव्र फटका मुळशी तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला बसला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील संपूर्ण महसूल कामकाज ठप्प झाले आहे.नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणाची गंभीर दखल घेत चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी व दोन ग्राम महसूल अधिकारी अशा एकूण दहा अधिकार्यांचे निलंबन केले होते. या कारवाईमुळे राज्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी 15 डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाऊन कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा थेट परिणाम महसूल यंत्रणेवर झाला असून अनेक ठिकाणी कार्यालयीन कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. मुळशी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकार्यांनी मुळशी तहसीलदार कार्यालयात एकत्र येत आंदोलनाला तीव्र स्वरूप दिले. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याने तहसील व प्रांत कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. शासनाच्या भूमिकेकडे लक्ष या आंदोलनामुळे उत्पन्नाचे दाखले, सातबारा, फेरफार, जमीन विषयक कामांसह विविध शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. निलंबित दहा अधिकारी व कर्मचार्यांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत सामूहिक रजेवर जाऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणावर शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वसामान्य नागरिकांसह महसूल कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.