प्रभात वृत्तसेवा पौड – ग्रामपंचायत कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे पौड (ता.मुळशी) ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी प्रदीप झेंडे आणि सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्यावर गटविकास अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. पौडचे सरपंच किरणकुमार आगनेन यांनी दोन जानेवारीला पौड पंचायत समितीसमोर ग्रामस्थासमवेत आंदोलन केले होते. तेव्हा गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी नऊ जानेवारीपर्यत दोघांनाही त्याचे म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती.या काढलेल्या आदेशामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी प्रदीप झेंडे यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. झेंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी हा आदेश काढला. तर तत्कालीन सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्यावरही कारवाई करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केला. याबाबत सरपंच किरणकुमार आगनेन यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. या ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी झेंडे आणि सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्या कार्यकाळात काही कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सरपंच किरणकुमार आगनेन यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत सरपंच आगनेन यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे गावात झालेल्या विकास कामांची, तसेच त्यावर खर्च केलेल्या निधीच्या चौकशीची मागणी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे भागवत यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी एम.पी.चव्हाण यांच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच झालेल्या विकास कामांची पाहणी करण्यत आली. चव्हाण यांनी दिलेल्या चौकशी अहवालात ग्रामपंचायतीचा पंधरा टक्के मागासवर्गीय निधी, शालेय साहित्य खरेदी, सीसीटीव्ही खरेदी आदी कामकाजामध्ये झेंडे यांच्या कार्यकाळामध्ये अनियमितता झाली असलेबाबत नमूद केले. तसेच नियमानुसार कायदेशीर कार्यवाही व्हावी असा अहवाल त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला. मात्र अहवाल देऊन अनेक दिवस झाल्यानंतरही पंचायत समिती विभागाकडून दोषींवर कुठलीही कारवाई झाली नाही. वेतनवाढ रोखण्याचेआदेश त्यामुळे सरपंच आगनेन हे काही ग्रामस्थांसमवेत शुक्रवारी (दि.२) पंचायत समिती प्रवेशव्दारासमोरच आंदोलनाला बसले होते. त्यावेळी भागवत यांनी आंदोलनस्थळी येवून कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. शुक्रवारी (9 जानेवारी) भागवत यांनी झेंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.