प्रभात वृत्तसेवा सोरतापवाडी ( सचिन सुंबे ) – हवेली तालुक्यातून वाहणारी मुळा-मुठा नदी मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली असून पाण्याच्या पृष्ठभागावर पांढरे शुभ्र फेसाचे थर तयार झाले आहेत. या फेसासोबत येणारा उग्र रासायनिक वास परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, नायगाव, कोरेगावमूळ, प्रयागधाम, भवरापूर, खामगाव टेक आदी पूर्व हवेलीतील गावांतून वाहणारी ही नदी आता अत्यंत गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून शेतीसाठीही हे पाणी धोकादायक ठरत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. पुणे शहराच्या परिसरात वाढलेल्या उद्योगधंद्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी शुद्धीकरणाशिवाय सर्रास नदीत सोडले जात असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अशा रासायनिक पाण्यामुळे नदीतील जलचर जीव, जलवनस्पतींची हानी होत असून अनेक ठिकाणी मासेमारी पूर्णपणे बंद पडली आहे. नदीकिनारी गेल्यावर नाकाला झोंबणारा तीव्र वास, पाण्यावर तरंगणारा बर्फासारखा पांढरा फेस नागरिकांना त्रास देत आहे. नदी पांढर्या फेसाने झाकली जाऊन बर्फाच्छादित नदीचा भास होतो; परंतु लगेच येणारा वास हे दृश्य रसायनयुक्त प्रदूषणाचे असल्याचे पक्के करतो. शेतीला वाढता धोका नदीपात्रातील हे पाणी शेतकरी शेतीसाठी पंपाने उचलतात. परंतु या प्रदूषित पाण्यामुळे पिकांचा तजेलदारपणा कमी होत आहे. पिके कमकुवत होत असल्याने शेतकर्यांना अतिरिक्त रासायनिक औषधे वापरण्याची वेळ येत आहे. पेठ गावचे प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय चौधरी व सोरतापवाडीचे शेतकरी भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात. अन्यथा शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांना अपरिमित हानी होणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका रासायनिक प्रदूषणामुळे पाण्यात निर्माण होणारे विषारी घटक – किडनी, फुफ्फुसे, लिव्हर, त्वचा यांना गंभीर धोका निर्माण करतात. मनुष्य आणि जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. “मुळा-मुठा नदी फेसाळण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष व प्रशासनाची निष्क्रियता. या समस्येवर तातडीची, प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई अपरिहार्य आहे.” – दत्तात्रय काकडे, ग्रामपंचायत सदस्य, कोरेगावमुळ