प्रभात वृत्तसेवा चाकण – राज्यातील सरकार आणि काही अधिकारी ‘नोंदी असूनही जाणूनबुजून अडथळे निर्माण करत आहेत,’ असा गंभीर आरोप मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांच्या सांत्वनासाठी जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कुणबी दाखला पडताळणी प्रक्रियेतील विलंबावरून सरकार, प्रशासन आणि काही अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.प्रशासनाकडे दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी, पुरावे आणि कागदपत्रे उपलब्ध असतानाही प्रमाणपत्रात विलंब का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘मुख्यमंत्र्यांनी एकही प्रमाणपत्र थांबणार नाही असे सांगितले आहे. मग ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळत का नाही? अशी विचारणा त्यांनी केली. प्रमाणपत्र न मिळाल्यास लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगून जरांगे म्हणाले की, शिंदे समिती सुरू करण्याचे आश्वासन मिळाले आहे आणि ते निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. अधिवेशनात गोंधळाचे भाकीत आगामी अधिवेशनाबद्दल बोलताना जरांगे यांनी ‘दोन दिवस तर त्यांच्या भांडणातच जातील’ असे भाकीत केले. शेतकऱ्यांचे वाटोळे होणार, त्यांना काही दिले जाणार नाही. सर्व जातींचे आरक्षणाचे विषय पेंडिंग आहेत. सरकारने लोकांचा मूड आणि गरज ओळखून काम करण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी, आरक्षण आणि प्रशासनावर थेट टीका शेतकऱ्यांवरील धोरणांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, कर्जमाफी करणार असाल तर आदेश द्या, नुसते बोलून काही होत नाही. हे सत्ताधारी असो किंवा विरोधक, सगळेच ‘लई चाभरे’ आहेत. त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित घातपात प्रकरणाचाही उल्लेख करत परवानगी का घेतली नाही? असा सवाल उपस्थित केला. न्याय न मिळाल्यास पुढचे पडसाद वाईट असतील, असा इशाराही त्यांनी दिला.