प्रभात वृत्तसेवा मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील गावाला दररोज नियमित वेळेत पाणीपुरवठा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाच्यामुळे वारंवार पाईपलाइन लिकेज होत असल्याने त्याचा परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. मागील तीन दिवसापासून पाईपलाइन लिकेज झाली होती.चार दिवसांनी नळाला पाणी आले.वारंवार नळ पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. अवसरी खुर्द गावाचा पाणीपुरवठा सावळा गोंधळ कधी संपणार असा सवाल महिलांनी उपस्थित केला असून ग्रामपंचायतीने दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत गावठाणात पाणीपुरवठा करावा.अन्यथा याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होईल, असा इशाराच महिलांनी दिला आहे.अवसरी खुर्द हे आंबेगाव तालुक्यात तीन नंबरचे मोठे गाव आहे. गावाला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज लागते. परंतु ग्रामपंचायतीच्या वतीने गेली १५ वर्षांपासून दिवसाआड तेही अर्धा ते पाऊण तास नळाला पाणी सोडले जाते.त्यामुळे दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी अपुरे पडते.गावाला पाणीपुरवठा करणारे मोरदरा पाझर तलाव ते गावठाण दोन किलोमीटर अंतर असूम विहीर ते गावठाण संपूर्ण लोखंडी पाईपलाईन करण्यात आली आहे.तरीसुद्धा लोखंडी पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्याने त्याचा परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. चार दिवसांपूर्वी लोखंडी पाईपलाईन लिकेज झाली होती. पाईपलाइन दुरुस्त करण्यासाठी तीन दिवस लागल्याने दुरुस्ती झाल्यानंतर रविवारी म्हणजेच चार दिवसांनी पाणी सोडण्यात आले. गावात दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत पाणी सोडणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून दिवसाआड व तेही अर्धा, पाऊण तास पाणी सोडले जाते.त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना अडीचशे ते तीनशे रुपये रोज बुडवून पाण्यासाठी घरी बसावे लागत आहे. वेळेत पाणी सोडण्याचा प्रयत्न करू याबाबत ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिदोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मोरदरा पाझर तलाव ते गावठाण पाणी टाकी दरम्यान ओढ्याजवळून गेलेली लोखंडी पाइपलाइन गंजल्याने पाइपलाइन लिकेज झाली होती. कामगार मिळाला नसल्याने पाइपलाइन जोडता आली नाही तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर पूर्वी साडेसात हाऊस पॉवरची मोटर होती.