प्रभात वृत्तसेवा मंचर – राज्यात अलीकडे पार पडलेल्या निवडणुकांमध्ये घडलेल्या विविध प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे दिसून येत आहे. मतदानादरम्यान दबावाची परिस्थिती, बोगस मतदानाच्या तक्रारी, दहशत, गुंडगिरी तसेच मतदारांना पैसे वाटपाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे निवडणुका किती पारदर्शकपणे होत आहेत. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटी, मतदार यादीतील गैरसोय आणि निकाल जाहीर करण्यात आलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. मतमोजणीला विलंब होत असल्याने निकालाबाबत अनिश्चितता निर्माण होत असून राज्यात पारदर्शक व निष्पक्ष निवडणुका होत आहेत का याबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे. आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर करताना काटेकोर नियोजन करावे आणि अभ्यासपूर्ण नियमावली जाहीर करूनच निवडणूक पार पाडावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. मात्र अनेक वेळा निवडणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये नागरिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागत असून आयोगाकडून अपेक्षित तत्परता दिसत नसल्याची टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात वारंवार न्यायालयात दाद मागावी लागते. यामुळे कोर्टच आता राज्य चालवत आहे का? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या सर्व घडामोडींवर सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणूक प्रणाली पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची मागणी जोर धरत आहे.