प्रभात वृत्तसेवा मंचर – गेल्या काही दिवसात समाजामध्ये नकारात्मकता येताना दिसत असून रामायण,महाभारत भागवत कथा यांच्या माध्यमातून ही नकारात्मकता दूर करता येते.जीवनाला एक नवी दिशा मिळवून देण्याचे काम धार्मिक ग्रंथ, कथा करत असतात.असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गौरवप्रीत्यर्थ सोहळ्यानिमित्त मंचर मार्केटयार्ड येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा ज्ञानयज्ञासाठी गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित डॉ.विकासानंद महाराज मिसाळ हे कथा व्यास म्हणून लाभले आहेत. मंचर बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, संचालक मंडळ,बाजार समितीतील मार्केट यार्ड मित्र मंडळ,श्री गुरुदत्त प्रतिष्ठान,आडत व्यापारी असोसिएशन, तरकारी आडत व्यापारी असोसिएशन,हमाल मापाडी संघटना संचालक, कर्मचारी वृंद कृषि उत्पन्न बाजार समिती श्री दत्तकृपा ना.सह.पतसंस्था मर्या., मंचर कमर्शियल कॉम्प्लेक्स, व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भागवत कथा संपन्न झाली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन करताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,गणेशनाथ महाराज,ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले,किरणताई वळसे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर आपल्याजवळ असून मंदिर परिसरात विविध विकास कामे भाविकांच्या सुख सोयीसाठी शासनाच्या माध्यमातून २२७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विकास कामे सुरू झाली आहेत. तसेच उद्योजक देवेंद्र शहा यांच्या माध्यमातून एकलहरे येथे जैन धर्मियांचे मोठे तीर्थक्षेत्र उभे राहणार असून जवळपास २०० कोटी रुपये लोकवर्गणीतून गोळा करून हे तीर्थक्षेत्र उभे राहणार आहे. बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात म्हणाले, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे तालुक्याच्या भल्यासाठी ते काम करत असून त्यांनी त्यांचें आयुष्य हे तालुक्याच्या विकासासाठी खर्च केले आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.