प्रभात वृत्तसेवा मंचर – नुकत्याच अस्तित्वात आलेल्या मंचर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील बाणखेले आणि शिवसेनेचे बाजीराव मोरडे यांची नियुक्ती बुधवार, दि.१४ रोजी करण्यात आली.पहिल्यांदाच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे निवडून आल्या आहेत. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे तीन,अपक्ष तीन तर उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. शिवसेनेने ‘श्री भैरवनाथ मंचर परिवर्तन आघाडी’ स्थापन करून विकास जाधव यांची गटनेतेपदी निवड केली. या आघाडीला अपक्ष व इतर पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने नगराध्यक्षांसह सात नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मण थोरात यांची गटनेतेपदी निवड केली असून अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे त्यांचे संख्याबळ अकरा झाले होते. उपनगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला राष्ट्रवादीचे लक्ष्मण थोरात आणि उबाठाचे वसंतराव बाणखेले यांनी अर्ज दाखल केले होते; मात्र वसंतराव बाणखेले यांनी माघार घेतल्यानंतर लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक पदासाठीही पक्षांच्या सहमतीने निवड प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली. मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित केले. यानंतर नगरपंचायत कार्यालयात सर्व नगरसेवकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. दोन्ही प्रमुख पक्षांकडून आनंदोत्सव आणि मिरवणुका काढण्यात आल्या. “मंचर शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच राजकारण विरहित मंचरचा विकास केला जाईल. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणार आहे.” – राजश्री गांजाळे, नगराध्यक्ष – लक्ष्मण थोरात, उपनगराध्यक्ष