Manchar News – आंबेगाव तालुक्याचे प्रमुख केंद्र असलेल्या मंचर एसटी बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी मोठा टप्पा पार पडला असून ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. विकासकामांच्या निधीतून मंचर एसटी बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणासाठी तब्बल ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात होणारा चिखल, तसेच उन्हाळ्यातील धुळीचा त्रास पूर्णपणे कमी होऊन परिसर स्वच्छ व सुटसुटीत होणार आहे. तसेच स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत उभारण्यासाठी १९ लाख ९९ हजार ५८९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंचर बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असून, स्थानकाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामांमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. “मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.” – दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.