प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांच्या माध्यमातून मंचर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू. विकासाची चिंता करू नका.पक्ष विरहीत मंचरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सुंदर मंचर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी गुरुवार, दि.१ रोजी केले. मंचर (ता.आंबेगाव) येथे नवीन वर्षाचे औचित्य साधत मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष राजश्री गांजाळे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे,उद्योजक रमेश येवले, माजी सरपंच दत्ता गांजाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव,नगरसेवक वसंतराव बाणखेले, विकास जाधव,अंजली बाणखेले,लक्ष्मण पारधी, अॅड. अंशरा शेख, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील,योगेश बाणखेले,सुप्रिया राजगुरव,अरुण नाना बाणखेले यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, मंचर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकला असून जनतेने दिलेला हा कौल आम्हाला मान्य आहे. या मागील काळात जेवढा निधी मंचर शहरासाठी मिळाला.त्यापेक्षा दहा पटीने अधिक निधी मंचर शहरासाठी आणू, पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी सर्व जागा लढवणार आहे.मंचर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी पहावयास मिळाली अनेकांना संधी मिळाली नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही, धनुष्यबाण संपणारे म्हणणाऱ्यांना चपराक बसली असून धनुष्यबाण हा कधीही संपू शकत नाही. “माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना पक्षात येणार, अशी चर्चा आमच्यातरी कानावर आली नाही. आम्ही पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश पाळून कामे करतो.नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक देखील चांगला विजय घेऊ.” – शरद सोनवणे,आमदार.