प्रभात वृत्तसेवा मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण तसेच दर्शन बारीतील पायऱ्यांचे काम हाती घेण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. या कामांसाठी शुक्रवार, दि.९ पासून पुढील तीन महिने संपूर्ण मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मंदिर बंद न ठेवता विकासकामे करतानाच दर्शन सुरू ठेवावे. अशी ठाम मागणी भाविकांकडून जोर धरू लागली आहे.भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक व टुरिस्ट गट आधीच सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीपूर्वी नियोजन करून येतात. यामध्ये हॉटेल बुकिंग, प्रवासाचे आरक्षण, ट्रॅव्हल एजन्सीमार्फत पॅकेजेस यासाठी आगाऊ रक्कम भरलेली असते. अशा परिस्थितीत अचानक तीन महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर हजारो भाविकांचे आर्थिक नुकसान होणार असून त्यांची श्रद्धाही दुखावली जाईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. विकासकामे आवश्यकच आहेत, याबाबत भाविकांचा विरोध नाही; मात्र विकास आणि दर्शन या दोन्ही गोष्टी समन्वयाने करता येऊ शकतात, असा आग्रह भाविकांचा आहे. भाविकांचे म्हणणे आहे की, सभामंडपाचे काम आणि दर्शन बारीतील पायऱ्यांचे काम टप्प्याटप्प्याने करता येऊ शकते. काम सुरू असताना दर्शनासाठी स्वतंत्र मार्ग, वेळापत्रक (टायमिंग स्लॉट) आणि आवश्यक सुरक्षितता व्यवस्था उभारून दर्शन सुरू ठेवणे शक्य आहे. अनेक मोठ्या तीर्थक्षेत्रांवर विकासकामे सुरू असतानाही दर्शन सुरू ठेवण्यात येते, याची उदाहरणे भाविक देत आहेत.मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे. हॉटेल व्यवसाय, दुकानदार, फेरीवाले, वाहनचालक, गाईड्स यांचे उत्पन्न थांबण्याची भीती आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी तोट्याचा ठरू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.प्रशासनाने भाविकांच्या भावना लक्षात घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. “आम्ही विकासकामांच्या विरोधात नाही, पण तीन महिने संपूर्ण मंदिर बंद ठेवणे अयोग्य आहे. योग्य नियोजन, वेळापत्रक आणि पर्यायी मार्ग करून दर्शन सुरू ठेवले पाहिजे. अन्यथा लाखो भाविकांचे नुकसान होईल.” -सूर्यकांत धायबर,संस्थापक अमरनाथ सेवा संघ, मंचर. “भाविकांनी सहा महिने आधी बुकिंग केलेली असतात, पैसे भरलेले असतात. अचानक मंदिर बंद ठेवल्यास आर्थिक फटका बसतो. विकास कामे झाली पाहिजे आणि दर्शन ही झाले पाहिजे. प्रशासनाने भाविकांचा विचार करून निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा.” – रमेश येवले, शिवसेना नेते, आंबेगाव तालुका.