प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्शगाव गावडेवाडी येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एकहाती वर्चस्व असताना उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप पक्षाचे बहुमत नसताना ही एकनाथ बाळकृष्ण गावडे हे निवडून आल्यामुळे खळबळ उडाली. विशेष म्हणजे एकूण ११ ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भाजपचा एकच सदस्य असताना त्यांनी मिळवलेला विजय चर्चेचा विषय झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच प्रियांका गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी ग्रामसेविका तृप्ती झरेकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मण शंकर गावडे व भाजप पक्षाच्या वतीने एकनाथ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले.गुप्त पद्धतीने मतदान झाले. लक्ष्मण गावडे यांना तीन मते मिळाली व एकनाथ गावडे यांना आठ मते मिळाली. एकनाथ गावडे यांचा सन्मान भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद व श्यामकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, आदर्शगाव गावडेवाडी ग्रामपंचायत तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा व शिवसेनेचे चार असे पक्षीय बलाबल होते.शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी मंचर येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण गावडे निवडून येतील, असा अंदाज होता.पण प्रत्यक्षात मात्र भाजपचे गावडे विजयी झाले आहेत.’पूर्व भागातील ग्रामपंचायतीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. असे उपसरपंच एकनाथ गावडे यांनी सांगितले. गटबाजीमुळे विजय विविध गावात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असताना अंतर्गत गटबाजी यामुळे अनेक ठिकाणी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.वरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र दिसतो.परंतु अंतर्गत मात्र कलह असल्याचे उदाहरण गावडेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत असणारी गटबाजी थांबवावी.अन्यथा भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीला मोठा धोका होण्याची शक्यता एका राजकीय जाणकार व्यक्तीने व्यक्त केली.