प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार, दि.२१ रोजी होणार असून, ती तारीख जशी जशी जवळ येत आहे.तशी तशी नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढत चालली आहे.संपूर्ण शहराचे लक्ष आता केवळ मतमोजणी आणि विजय उमेदवाराच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एका नगराध्यक्ष पदासाठी तसेच सोळा प्रभागांमधील नगरसेवक पदासाठी मतदान पार पडले आहे.निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता.घराघरांत जाऊन मतदारांना भेटी, सभा, बैठका आणि प्रचाराच्या माध्यमातून उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली. आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने निकालाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. समर्थकांकडून जल्लोषाची तयारी समर्थकांकडून विजयाचे अंदाज बांधले जात असून, काही ठिकाणी आधीच जल्लोषाची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.रविवारच्या मतमोजणीनंतर मंचर नगरपंचायतीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार असून, शहराच्या विकासाची दिशा कोणाच्या हाती जाणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष निकालाकडे खिळले आहे.