प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस पाहावयास मिळाली. काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर केल्याची चर्चा शहरभर जोरात सुरू आहे. या प्रकारामुळे निवडणूक लढवण्यापेक्षा मतदार होणेच फायदेशीर ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार खाजगी बैठकी मध्ये देत आहे. अनेक मतदारांनी पैसे स्वीकारल्याची माहिती स्थानिक स्तरावर फिरत असून, काही प्रभागात एका मताला तब्बल आठ ते दहा हजार रुपयांचा भाव मिळाल्याचे बोलले जात आहे. तर तुलनेने इतर काही प्रभागांमध्ये तीन ते चार हजार रुपये प्रति मत असा ‘दर’ असल्याची चर्चा आहे. काही मतदारांच्या कुटुंबातील सदस्यसंख्या मोठी असल्याने त्या कुटुंबांना एकूण ४० ते ५० हजार रुपयेपर्यंत रक्कम मिळाल्याच्या चर्चांनी शहरात खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे निवडणूक लढवण्यापेक्षा मतदार होणेच फायदेशीर ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार देत आहे. मतांची सर्रास खरेदी-विक्री झाल्याच्या चर्चेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची शुचिता आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचे नागरिकांमध्ये म्हटले जात आहे.