प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची निवडणूक मतदान जसजशी जवळ येत आहे, तसतशी तिची चुरसही वाढू लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचे स्वरूप अधिक आक्रमक होत असून अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह विविध सोशल प्लॅटफॉर्मवर भावनिक आवाहन, व्हिडिओ संदेश, कुटुंबीयांसह ग्रामस्थांची साथ दाखवणारी पोस्ट यांची रेलचेल सुरू झाली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांनी स्वतःच्या कार्याचा आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिकेचा उल्लेख करत भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही उमेदवारांनी आपल्या समर्थकांची एकजूट दाखवण्यासाठी, तर काहींनी आपल्या कुटुंब आणि समाजाने दिलेल्या पाठिंब्याचे प्रदर्शन करण्यासाठी खास फोटोसेशन्स करून सोशल मिडीयावर वापर सुरू केला आहे. नेत्यांचे, पक्षातील ज्येष्ठांचे तसेच आपल्या भावकीतील प्रभावशाली व्यक्तींचे फोटो मोठ्या फ्लेक्सवर लावून प्रचाराला वेग दिला जात आहे. काही ठिकाणी हे फ्लेक्स मतदारांसाठी संदेश देणारे, तर काही ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करणारे असल्याचेही दिसते. एकूणच, सोशल मीडियावरील प्रचाराने वातावरण तापू लागले असून निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.मतदारांच्या मनावर छाप पाडण्यासाठी पुढील काही दिवसांत या डिजिटल स्पर्धेला अधिक वेग येणार, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.