प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून एकूण १७ प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची प्रचारयात्रा वेग घेत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक सकाळपासून रात्रीपर्यंत पदयात्रा, घराघर भेटी आणि वैयक्तिक संवादातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी आपला प्रचाराचा जोर वाढवला असून अनेक ठिकाणी गाठीभेटी, कोपरा सभा आणि परिसर भेटी अशा विविध मार्गांनी ते जनसंपर्क वाढवत आहेत. मंगळवार, दि.२ रोजी मतदान होत असल्याने मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने कार्यकर्ते मतदार यादी हातात धरून घरोघरी पोहोचू लागले आहेत.पत्रके वाटत मतदारांना मतदानाचे आवाहन करणे, आपल्या उमेदवाराची कामगिरी पटवून देणे, विरोधकांशी तुलना करणे अशा विविध पद्धतींनी प्रचार अधिक तीव्र होत आहे. “पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करीन, मला एकदा संधी द्या,” असे भावनिक आवाहन करून अनेक उमेदवार मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण विकासकामांची हमी देत आहेत. तर काहीजण आपल्या मागील कामगिरीचा उल्लेख करून मतदारांना पटवून देत आहेत. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामेही जाहीर केले असून ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कौल कोणाला, उत्सूकता वाढली रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, बाजारपेठ सुधारणा, क्रीडा सुविधा, सामाजिक योजना अशा विविध मुद्द्यांवर पक्ष मतदारांना आश्वासने देत आहेत. एकूणच, मंचर नगरपंचायतीत वातावरण तापले असून प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे.मतदानाचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता वाढत असताना पुढील काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होणार आहे.