प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ (ता. आंबेगाव) येथील खत व औषधाच्या दुकानात चोरी करणार्या दोन सराईत चोरट्यांना मंचर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 11 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पेठ येथील किरण कैलास कुंदळे यांच्या सह्याद्री कृषी उद्योग या खत-औषध दुकानात 1 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या चोरीत दुकानातील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीचा माल इर्टिगा कारमधून (एमएच 15 डीएम 8127) मंचर ते सुलतानपूर रोडवरील नवीन पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाखाली विक्रीसाठी आणला जाणार आहे. पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी संतोष पोपट नलावडे (वय 34, रा. नाणेकरवाडी, चाकण) व अमर संतोष नायक (वय 19, रा. खराबवाडी) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपये किमतीची इर्टिगा कार तसेच चोरीतील 3 लाख 11 हजार 205 रुपयांची खते, औषधे व बियाणे असा एकूण 8 लाख 11 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार नंदकुमार आढारी करत आहेत.