Mahesh Landge – भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी कष्टकर्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी आज भेट देऊन शहरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. कष्टकर्यांच्या उपजीविकेचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांच्या उन्नतीसाठी एकत्रित लढा देण्याचा ठाम संकल्प यावेळी करण्यात आला. नॅशनल ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील कष्टकर्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये ऑटो-टॅक्सी चालक व मालकांचे प्रलंबित प्रश्न, टपरी-पथारी-हातगाडी धारक, फळभाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न, बांधकाम मजूर, हमाल-माथाडी व साफसफाई कामगारांच्या सुविधा तसेच घरकाम करणार्या महिला व स्वयंपाक करणार्या महिलांच्या कल्याणकारी योजनांचा समावेश होता. आमदार महेश लांडगे यांनी या सर्व प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देत, शहराच्या विकासात कष्टकरी वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.कष्टकरी जनतेचा आवाज ऐकणारे नेते आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते एकत्र आले तर समाजात सकारात्मक बदल घडतो, अशी भावना डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली. भविष्यात कष्टकरी वर्गाच्या उन्नतीसाठी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.या भेटीमुळे शहरातील कष्टकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या मागण्यांना आता राजकीय बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.