प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथे वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी (दि. ११) पहाटे तीनच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला करून एक पाळीव कुत्रा पळवून नेला. घटनेच्या वेळी दोन कुत्र्यांना बिबट्या आल्याचे जाणवल्याने त्यांनी भुंकायला सुरुवात केली. त्यातील एका कुत्र्यावर झडप घालून बिबट्याने त्याला जंगलाच्या दिशेने पळवून नेले. कामगार बाहेर आल्यावर त्याला एकच कुत्रा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. नाथ यांनी पोल्ट्रीवर येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्याने कुत्रा उचलून नेल्याचे दिसले. ही दृश्ये पाहून ग्रामस्थ आणखी भयभीत झाले आहेत. वाघाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे नियमित दर्शन होत असल्याने शेतात कामाला जाण्यास, मुलांना घराबाहेर सोडण्यास आणि घराजवळ पशुधन बांधण्यास धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्ग विशेष चिंतेत आहे. पिंजऱ्याची तातडीची मागणी घटनेनंतर दादाभाऊ नाथ, सूर्यकांत बढे, सुनील गावडे, गणेश गावडे, रमेश बढे यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा बसविण्याची मागणी केली आहे. प्राण्यांचे नुकसान झाले आहेच, पुढे एखाद्या माणसावर हल्ला झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, रात्री गस्त वाढवावी आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.