प्रभात वृत्तसेवा न्हावरे – आंबळे (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वनविभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे आंबळे आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबळे परिसरात बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे संभाव्य धोका ओळखून वनविभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. जेरबंद झालेली ही मादी अंदाजे दीड वर्ष वयाची असून, ती पूर्णतः निरोगी आणि सुरक्षित असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जेरबंद केलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. या बिबट्याची रीतसर वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात किंवा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे.या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वनविभागाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.