जांबुत : फाकटे (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. ३) पहाटे एका विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले. अंदाजे तीन वर्ष वयाच्या मादी संवर्गातील बिबट्याला यशस्वीरित्या बाहेर काढल्यानंतर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले. यापूर्वी फाकटे येथे दोन बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी (दि. ३ ) सकाळी फाकटे येथील शेतकरी नवनाथ दत्तू शेलार हे त्यांच्या शेतातील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे दिसले. ते पाहून नवनाथ शेलार यांनी तात्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि वनरक्षक लहू केसकर यांना संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार महेंद्र दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ फाकटे गावातील घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेत आणि योग्य नियोजन करून, रेस्क्यू टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने मोठ्या कौशल्याने व सुरक्षितपणे बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी आणि बचाव पथकाच्या जलद प्रतिसादाबद्दल आणि यशस्वी बचाव कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.