प्रभात वृत्तसेवा बेल्हे – नळवणे (ता. जुन्नर) शिवारातील देशमुख वस्ती येथे शनिवारी (दि. 29) मध्यरात्रीनंतर विहिरीत पडलेल्या बिबट्यास ग्रामस्थ व वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यास यश आले आहे.रविवारी (दि. 30) सकाळी नळवणे (ता. जुन्नर) येथील देशमुख वस्ती जवळील चंद्रकांत बबन शिंदे हे आपल्या शेतातील विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आढळून आला. त्यांना शेजारी आपल्या शेतात पाणी भरत असणारे अनिकेत देशमुख यांना आवाज दिला व बोलावून घेतले. त्यानंतर या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ, तरुण मुले यांनी गर्दी केली. अनिकेत देशमुख यांनी फोन करून या बाबत वनविभागला माहिती कळविली.हा बिबट्या विद्युत पंपचा पाइप कुरतडून विहिरीचे कपारीत बसला असल्याचे दिसले. बेल्हे वनपरिमंडळच्या वनपाल नीलम ढोबळे, वनरक्षक राजेंद्र गाढवे, वनरक्षक विश्वराज सोळंके, वनमजूर जिजाबा भंडलकर यांचेसह आळे वनपरिमंडळ व नगदवाडी वनपरमंडळाच्या रेस्क्यू टीम हे तत्काळ घटनास्थळी आले. पिंजरा विहिरीत सोडून बाबत पिंजर्यात गेला. दीड दोन तास चाललेल्या थरारक कसरतीने बिबट्याला अखेर सुरक्षित बाहेर काढले. सुमारे पाच वर्ष वयाचा हा नर बिबट असून त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. यासाठी नळवणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग गगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे, गणेश देशमुख, सचिन देशमुख, मंगेश देशमुख व बाळु कटारियासह स्थानिक ग्रामस्थ यांनी यासाठी मदत केली. शिवारात अन्न- पाण्याच्या शोधात शनिवारी मध्यरात्रीनंतर फिरणारा बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज आहे.