प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील बाळोबाचीवाडी परिसरात ऊसतोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्यांच्या बछड्यांचे त्यांच्या आईशी यशस्वी पुनर्मिलन घडवून आणण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभाग आणि प्राणीमित्रांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांनंतर मादी बिबट्याने आपल्या दोन्ही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेल्याचा सर्व प्रकार वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बछड्यांना एका जाळीदार टोपलीखाली ठेवण्यात आले आणि तिथे ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला. रात्रीच्या वेळी बिबट मादीने तिथे दोन वेळा येऊन आपल्या दोन्ही बछड्यांना तोंडात पकडून सुरक्षितस्थळी नेले. पिल्लांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन झाल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिकांचे सहकार्य गरजेचे शेतामध्ये काम करताना कोठे बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर त्या पिल्लांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन करणे गरजेचे असते, अन्यथा आपल्या पिल्लांच्या शोधात असलेली बिबट मादी अधिक आक्रमक आणि घातकी होऊ शकते. वनविभाग आणि रेस्क्यू टीम यासाठी सतत कार्यरत असते, मात्र या प्रक्रियेत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.