प्रभात वृत्तसेवा राहू – आज पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक जनावरांचा फडशा पडला आहे. तसेच काही वृद्ध आणि बालकेही बिबट्यांच्या हल्ल्याला बळी पडले आहेत. असे असताना वन खाते मात्र नागरिकांची अक्षरशः चेष्टा करताना दिसत आहे. जुन्नर आंबेगाव,खेड,शिरूर,दौंड इत्यादी तालुक्यात रोज कोठे ना कोठे बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत. परंतु वन विभागाने आतापर्यंत कठोरपणे कोणतीच उपाय योजना केलेली दिसून येत नाही. घटना झाल्यावर येऊन फक्त पंचनामा करणे व सांत्वन करणे एवढेच वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या हातात आहे,की काय अशी शंका येते. त्या मुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत. तर नागरिकांनाच आता काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल, अशी शक्यता वाढत आहे. आजही अनेक ठिकाणचे शेतकरी हे रात्रीचे पाणी पिकांना देत आहेत त्याच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. दहिटने येथील नरभक्षक बिबट्या अजूनही सापडला नाही. दहीटने येथील लहान बालकाला 30 जून 2025 रोजी बिबट्याने उचलून नेऊन ठार मारले होते. तो बिबट्या अजूनही वन विभागाला सापडलेला नाही. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी अनेक वेळा तो बिबट्या परत दिसून आला आहे. पिंजऱ्यातील बिबटे नक्की कुठे सोडतात? वन विभाग अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करते व घेऊन जाते. परंतु जेरबंद झालेले बिबटे नक्की कोठे सोडले जातात. याचा अंदाज नागरिकांना आलेला नाही व वन विभागाकडे देखील याचे कोणतेही रेकॉर्ड सापडत नाही. मग हे बिबटे नक्की जातात कोठे हा मोठा प्रश्न आहे.हे जेरबंद केलेले बिबटे शेजारच्या गावात तर सोडले जात नाही ना!!!! असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भरपाई पैशाने जीव विकत घेता येतो का? व्यक्तीचा जीव गेल्यावर वन विभाग सरकारी मदत जाहीर करते.परंतु या मिळालेल्या मदतीने त्या व्यक्तींचा जीव परत येणार आहे का?की जीवाची तुलना तुम्ही पैशाबरोबर करता.हा महत्वाचा प्रश्न आहे.तसेच ही जाहीर झालेली मदत देखील अनेक वेळा मिळत नाही. नेते विधानसभेत बोलतात पण… संबंधित स्थानिक आमदार यांनी देखील विधानसभेत विषय मांडत असताना बिबट्या संदर्भात कायदेशीर अभ्यास करून काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे. किंवा काही नियम शिथिल करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे की जेणेकरून धोरणात्मक बदल होईल.उगीच नागरिकांच्या समाधानासाठी मोघम बोलणे योग्य नाही. “आम्ही जेरबंद केलेले बिबटे हे बावधन येथील उपचार केंद्रात दाखल करतो.व जर त्याची शारीरिक परिस्तिथी चांगली असेल तर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडतो.” -राहुल काळे -आरएफओ,दौंड