प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन पशुधनावर हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर एक नर बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे.तळेगाव ढमढेरे व जातेगाव खुर्द परिसरातील मासळकर वस्ती येथे बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाच्या वतीने गणेश मासळकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. शनिवारी (दि. २०) सकाळी गणेश मासळकर शेतात गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, सोपान अनासूने आणि वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, वैभव निकाळजे, राहुल गायकवाड व परमेश्वर दहीरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गणेश मासळकर, सिताराम मासळकर, विशाल मासळकर यांच्यासह अन्य नागरिकांच्या उपस्थितीत या बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे चार वर्षे वयाचा असून तो नर प्रवर्गातील आहे. या बिबट्याची रवानगी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.