प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या सुलतानपूर रस्त्यालगत चिंचोटीमळा परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ अधिकच अस्वस्थ झाले आहेत. शेतकरी अतुल बाणखेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने आतापर्यंत अनेक जनावरे व कुत्र्यांवर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागातील जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण आहे. वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि वाढत्या घटनांचा आढावा घेऊन वनविभागाने तातडीने कारवाई करत चिंचोटीमळा परिसरात विशेष पिंजरा लावला आहे. वनअधिकाऱ्यांच्या पथकाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना रात्री उशिरा किंवा पहाटे एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जनावरांना सुरक्षित बांधून ठेवावे, शेतातील झुडपे व अडगळीच्या जागा स्वच्छ कराव्यात, अशा सूचनाही विभागाकडून देण्यात आल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठीही चौकशी सुरू असून, पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन गावकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.