प्रभात वृत्तसेवा मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) गावात बिबट्यांची दहशत पुन्हा वाढू लागली असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार, दि.२ रोजी रात्री अवसरी–कामठेमळा रोडवर गणपती कारखान्याजवळ तीन बिबटे रस्ता ओलांडून जातानाचा थरारक क्षण एका तरुणाने मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडिओमुळे परिसरात चर्चा रंगली आहे.दरम्यान बुधवार दि.३ रोजी पहाटे हासवडमळा भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अडकला.गेल्या काही महिन्यांपासून या भागात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांनी पिंजरे वाढवण्याची मागणी केली होती. स्थानिक शेतकरी राजू गावडे, शरद गावडे, संदीप गावडे यांच्या विनंतीनंतर या परिसरात पिंजरा लावण्यात आला आणि अखेर बिबट्या जेरबंद झाला.गणपती कारखाना परिसरात आधी लावलेला पिंजरा निष्फळ ठरल्याने ग्रामस्थांनी नव्या ठिकाणी पिंजरे उभारण्यावर जोर दिला. शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची रात्रीची ये-जा धोक्याची होत असल्याने सरपंच वैभव वायळ यांनीही या भागात तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी केली आहे.पिंजरा लावण्याच्या आणि तपासणीच्या कामात गुलाब इनामदार, नवाब इनामदार, बाळासाहेब गावडे, अनिल गावडे, रज्जाक पठाण यांनी सक्रिय सहकार्य केले. पकडलेला बिबट्या मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले आणि वन कर्मचारी यांच्याकडून सुरक्षितपणे अवसरी उद्यानात हलवण्यात आला.गावात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळत असल्याने वनविभागाने गणपती कारखाना परिसरात आणखी एक पिंजरा दुपारपर्यंत उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.