प्रभात वृत्तसेवा जांबूत – काठापूर खुर्द (ता. शिरूर) परिसरातील शेतकरी संतोष दशरथ वाव्हळ यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (दि. १५) पहाटे सात वर्षीय मादी बिबट जेरबंद झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य स्थानिकांच्या निदर्शनास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काठापूर खुर्दच्या सरपंच सिमा थिटे आणि विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक दाते यांनी या भागात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची वारंवार मागणी केली होती. अनेक दिवसांपासून बिबट्याच्या भीतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या भागातून बिबट्यांची संख्या अजूनही कमी झाली नसल्याने वनविभागाने बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, फाकटे, काठापूर खुर्द आणि परिसरात पिंजरे लावून वास्तव्य करणारे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर ऊर्फ नितीन पिंगळे यांनी केली आहे. वनताराला बिबटे जाणार कधी? बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूने संतप्त नागरिकांच्या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी पुढील पंधरा दिवसांत तात्काळ माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात स्थानबद्ध केलेले वीस बिबटे गुजरात येथे वनतारा पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, याबाबतची कार्यवाही अद्यापही प्रशासकीय बाबींच्या लालफितीत अडकलेली आहे.