प्रभात वृत्तसेवा शिरूर – टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या दहशतीला काही अंशी विराम मिळाला असून, वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी रात्री एक चार वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली आहे. या भागातील टेमकरवाडी, तामखरवाडी आणि गावठाण परिसरात बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी व मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण होते. टाकळी हाजी येथील नामदेव लोखंडे यांच्या शेतात वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पिंजरा लावला होता. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेली ही बिबट मादी पिंजऱ्यात अडकली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही मादी चार वर्षांची असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली.पिंपरखेड बीट अंतर्गत आतापर्यंत एकूण २७ बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. सध्या शिरूरच्या बेट भागात ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने ऊसाची शेते मोकळी होत आहेत, परिणामी बिबट्यांचा मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी या परिसरात बिबटे समूहाने फिरत असल्याचे आणि आवाज देत असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. परिसरात अजूनही इतर बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्क राहावे, असे आवाहन शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.