प्रभात वृत्तसेवा महाळुंगे पडवळ – ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सव्वा खंडी पाटीलवस्ती येथे मच्छिंद्र दत्तात्रेय सैद यांच्या उसाच्या शेतात तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यामुळे उसतोड करण्याऱ्या मजुरांची धांदल उडाली. वनविभागाने बछडे ताब्यात घेतले असून पुन्हा मादीच्या स्वाधीन करण्यासाठी उसाच्या शेतात ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सैद यांच्या शेतात मंगळवारी (दि. ९) उसाची तोड सुरू होती. माजी सरपंच भिवाजी महादेव चासकर यांच्या घरासमोर सैद यांचे उसाचे शेत आहे. उसाची तोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दुपारी दोन बछडे दिसल्याने मजूर घाबरल्याने त्यांनी आरडाओरड करत तेथून पळ काढला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी व विठ्ठल पोखरकर यांनी वनविभागाला बिबट्याचे बछडे आढळून आल्याची माहिती दिली.वनरक्षक रईस मोमीन व वनसेवक काळूराम गायकवाड यांनी बछडयांना ताब्यात घेतले असून पुन्हा मादीच्या स्वाधीन करण्यासाठी उसाच्या शेतात ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. यावेळी सरपंच सुजाता चासकर, माजी उपसरपंच विकास पडवळ, निखील पडवळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दुर्घटना घडण्याअगोदर वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.