शिरूर : निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील कवठे येमाई रोडवर, घोड नदीच्या काठावर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि. २) रात्रीच्या सुमारास एक नर बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाला. सुमारे सहा ते सात वर्षे वयोगटातील या बिबट्याला माणिकडोह बचाव केंद्रात सुरक्षित स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती वनरक्षक नारायण राठोड यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून निमगाव दुडे, दुडेवाडी,टाकळी हाजी येथील खडकवस्ती व रावडेवाडी परिसरात बिबट हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच घोडनदीच्या दोन्ही काठांवरील गावांमध्ये बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान, परिसरात ऊसतोडीचे काम सुरू असल्याने बिबटे ऊसातून बाहेर पडत असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच लावलेल्या पिंजऱ्यामुळे संभाव्य धोका टळला असून स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. फोटो : निमगाव दुडे येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट