पारगाव शिंगवे (लक्ष्मण ढोबळे) : जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरूळ (Pargaon Mangrul) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांची धडकी भरवणारी मालिका थांबायला तयार नाही. पिंपरखेडपासून (Pimparkhed) अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव मंगरूळ येथे आज, सोमवार (दि. १५ डिसेंबर) रोजी भर दिवसा सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कांदा काढणीचे काम सुरू असताना बिबट्याने शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय निष्पाप बालकावर अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भर दिवसा हल्ला; परिसरात पुन्हा भीतीचे गडद सावट – मृत्यू झालेल्या बालकाचे नाव रोहित बाबू कापरे (रा. धामणसई, ता. रोहा जि. रायगड) असे आहे. तो आपल्या मजुरी करणाऱ्या आई-वडिलांसोबत श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आला होता. रोहित शेताच्या बांधावर बसलेला असताना, परिसरातील ऊसाच्या दाट शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत नेले. यावेळी महिला मजुरांनी धाडसाने ऊसाच्या शेतात शिरून आरडाओरडा करून बिबट्याच्या तावडीतून रोहितला सोडवले. तात्काळ त्याला पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या भीषण हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे. पिंपरखेडजवळील चौथी घटना, प्रशासनावर तातडीची कारवाईची मागणी – काही दिवसांपूर्वी याच पिंपरखेड येथे रोहन बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आजची पारगाव मंगरूळ येथील घटना रोहन बोंबेच्या घटनास्थळापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर घडली आहे. पिंपरखेडच्या रोहन बोंबेच्या घटनास्थळापासून पाचशे मीटरच्या अंतरावरच ही घटना घडल्याने या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पुन्हा गडद झाले आहे. रोहित कापरे याचा झालेला मृत्यू पारगावच्या हद्दीत नोंदवला गेला असला तरी, पिंपरखेडजवळील या भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरली आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन आणि मानवी वस्तीवरील हल्ले चिंताजनकरीत्या वाढत असल्याने वन विभाग आणि स्थानिक प्रशासनावर नागरिकांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची आणि परिसरात तातडीने पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.