प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – येथील वारुळवाडी परिसरातील सुनील शंकर मेहेर यांच्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक बोकड, दोन शेळ्या व एक करडू ठार झाल्या आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) पहाटे तीनच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यात मेहेर यांच्या शेतात कामगार असलेले पशुपालक अशोक सखाराम आगलावे यांचे अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतमजूर अशोक आगलावे यांनी प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या आठ फुटी जाळीच्या जाळीच्या शेळ्या होत्या. मात्र, जाळीच्या खाली पक्के बांधकाम नसल्यामुळे बिबट्याने संधी साधली. बिबट्याने जाळीखालील माती उकरून आतमध्ये प्रवेश केला आणि चारही पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. उसाच्या शेतीत मृत जनावरांना ओढून नेल्याचे पाहणीत आढळले.घडलेल्या घटनेचा पंचनामा जुन्नर वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले आणि वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी केला. वनविभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, संरक्षक जाळीच्या पायाला पक्के बांधकाम नसल्यामुळे बिबट्याने सहज प्रवेश केला. यावरून ग्रामीण भागात बिबट्यांपासून पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केवळ जाळी नव्हे, तर पक्के बांधकाम करणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.या परिसरात उसाची व केळीची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी नैसर्गिक अधिवास मिळत आहे, ज्यामुळे बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत. यामुळे स्थानिक शेतकरी अनिल मेहेर, पराग मेहेर आणि सरपंच विनायक भुजबळ यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वनविभागाने शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे सुरक्षित ठेवून जाळीखाली पक्के बांधकाम करावे, असे आवाहन केले आहे. तसेच, शेतमजूर अशोक आगलावे यांना शासकीय भरपाई मिळवून देणार असल्याचे वनपाल अनिता होले यांनी सांगितले.