प्रभात वृत्तसेवा मलठण – राज्यात दिवसेंदिवस नागरी वस्तीसह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्या हल्ले करू लागला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीमा नदीकिनारी झाडे झुडपे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यानं दडण्यासाठी खूप जागा आहे. रात्री शिकारीच्या शोधत बाहेर पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्यांचे हल्ल्यामुळे धोक्यात आले आहेत. सायंकाळी सात वाजल्याापासूनच परिसातील लोकांना बिबटे दिसत आहे.बिबट्याची आवडती शिकार कुत्रा हा प्राणी आहे. गवशिवारातील कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. तर आलेगाव व बोरिबेल परिसरात शेतकऱ्यांना बिबटे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तरी बिबटे पाळीव जनावरांवर हल्ले करीत असेल तरी , अजून कुठल्याही मनुष्यावर हल्ले झाले नाहीत.परंतु वाढते हल्ले पाहता माणसांवर हल्ले होतील अशा भीतीने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच शेत मजूर भीतीने सायंकाळी लवकरच घरी परतत आहेत. ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला असल्याकारणाने ऊस तोड मजूर देखील भीतीच्या छायेखाली आहेत. हिंगणीबेर्डी येथील हनुमंत छबुराव गोधडे यांच्या शेतातील गोठयातील शेळी बिबट्याने ठार केली आहे. या घटनेची वन विभागाला माहिती देताच घटना स्थळी येऊन कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. “दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.सादर घटनेची पाहणी,पंचनामे करून आलेगाव येथे आज बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. आणखी हिंगणीबेर्डी परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे. तसेच बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.” – राहुल काळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड