प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथे वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार (दि.११) रोजी पहाटे घडलेल्या एका घटनेने गावात चिंतेचे सावट आणखी दाटले आहे. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्रीफार्मवर अचानक बिबट्या शिरला. एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून तो पळवून नेला.यावेळी पोल्ट्री परिसरात असलेल्या दोन कुत्र्यांनी बिबट्याचे अस्तित्व जाणवल्याने जोरात भुंकायला सुरुवात केली. मात्र त्या वेळी वातावरणात प्रचंड थंडी असल्याने पोल्ट्रीवरील कामगार जागा झाला नाही. काही मिनिटांच्या या विलंबाचा बिबट्याने फायदा घेतला आणि एका कुत्र्यावर झडप घालत त्याला ओढत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. थोड्याच वेळात कामगार बाहेर आला असता त्याला एकच कुत्रा भेदरलेल्या अवस्थेत भुंकताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तात्काळ नाथ यांना दूरध्वनीवर संपर्क केला. दादाभाऊ नाथ पोल्ट्रीवर पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याने कुत्रा उचलून नेल्याची दृश्ये दिसून आली. ही दृश्ये पाहून ग्रामस्थ आणखी भयभीत झाले आहेत. वाघाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे नियमित दर्शन होत असल्याने गावातील नागरिक सतत चिंताग्रस्त आहेत. शेतात सकाळी कामाला जाण्यास भीती वाटते. मुलांना घराबाहेर सोडण्याची धास्ती आहे. घराजवळ पशुधन बांधणेही धोकादायक ठरत आहे. शेतकरी वर्ग विशेषत: भयभीत आहेत. कारण रात्री व पहाटे बिबट्याच्या हालचाली वाढल्याचे अनेकांनी सांगितले आहे. पिंजऱ्याची तातडीची मागणी घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाकडून पिंजरा बसविण्याची मागणी दादाभाऊ नाथ, सूर्यकांत बढे, सुनील गावडे, गणेश गावडे, रमेश बढे यांनी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्राण्यांचे तर नुकसान झालेच आहे, परंतु पुढे एखाद्या माणसावर हल्ला झाला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उमटत आहे. ग्रामस्थांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा उभारणे, रात्री गस्त वाढवणे आणि गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देणे, अशी मागणीही होत आहे.