प्रभात वृत्तसेवा शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याने आता थेट गावठाण परिसरात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. गुरूवारी (दि. १८) रात्री दहाच्या सुमारास गावठाणातील महादेव व गणेश मंदिर परिसरात बिबट्याने एका कुत्र्याला ठार केले.या घटनेच्या आदल्या दिवशी, बुधवारी (दि. १७) मळगंगा मंदिर परिसरात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गावठाणातच बिबट्याने शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कवठे येमाई हे मोठी लोकसंख्या असलेले गाव असून येथील बाजारपेठ उशिरापर्यंत सुरू असते. सध्या थंडीच्या दिवसांत नागरिक रात्री शेकोटीभोवती बसतात किंवा कामानिमित्त बाहेर फिरतात. अशा वेळी बिबट्याचा वावर धोकादायक ठरत आहे. या घटनेची माहिती सरपंच मनीषा पांडुरंग भोर यांनी तातडीने वन विभागाला दिली. त्यानंतर वन कर्मचारी राठोड व वनमजूर हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लवकरच परिसरात पिंजरा बसविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.