प्रभात वृत्तसेवा लेण्याद्री – येथील अष्टविनायक तिर्थक्षेत्रावर रविवारी (दि. ७) संकष्ट चतुर्थीनिमित्त ‘श्रीगिरीजात्मज’ गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. दिवसभर भाविकांच्या गर्दीने लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यानिमित्ताने श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे श्रीगिरिजात्मजाच्या मूर्तीस व संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने पहाटे ५.३० वाजता विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली, त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. गोळेगाव येथील नामदेव गंगाराम कोकणे यांसह तिघांनी देवाच्या नैवेद्यासाठी केळीचा प्रसाद दिला. दिवसभर मंदिरात तीन वेळा महाआरती करण्यात आली. तसेच देवस्थानतर्फे विविध धार्मिक विधी पार पडले. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांसह सर्व विश्वस्तांनी नियोजन केले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी महाआरती करण्यात आली, त्यानंतर गोळेगाव येथील बाबुराव मारुती शेटे यांच्या स्मरणार्थ जालिंदर शेटे यांच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते.