प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत ओबीसी आणि बहुजन समाजाच्या एकजुटीचा विजय झाला असून, बहुजन समाज पार्टीच्या संघमित्रा काळुराम चौधरी यांनी मिळवलेला विजय हा आगामी काळातील बदलाचे संकेत आहेत. हाच ओबीसी पॅटर्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी येथे केले. निकालांनंतर संघमित्रा चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी लक्ष्मण हाके बारामतीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांची दहशत आणि सामाजिक दुजाभावाचे वर्तन महाराष्ट्राने पाहिले असून बारामतीतील विरोधक त्यांचे मांडलिक बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपसारख्या मोठ्या पक्षाला बारामतीत काहीच करता आले नाही, मात्र काळुराम चौधरी यांनी एकनिष्ठेने लढून यश मिळवून दाखवले. ज्या सत्ताधाऱ्यांना आम्ही सत्तेत बसवले, तेच आमच्या विरोधकांना सोबत घेऊन सत्ता राबवत आहेत, असे सांगतानाच आता ओबीसी, दलित आणि बहुजन समाज एकवटल्याने राज्याला वेगळा पर्याय देणार असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले. यावेळी निवडून आलेले नगरसेवक यशपाल पोटे आणि वनिता सातकर यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज विकासाचा पॅटर्न म्हणून ओळख असलेल्या बारामतीत हजारो कोटींचा निधी खर्च करूनही अजित पवार यांना सर्व ४१ जागा जिंकता आल्या नाहीत. अजित पवारांनी विरोध संपवण्यासाठी बेरजेचे राजकारण केले असले तरीही, सहा जागांवर विरोधकांनी विजय मिळवला आहे. २०१६ च्या निवडणुकीत ३९ पैकी ३५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा ४१ पैकी ३५ जागांवर समाधान मानावे लागले. अंतर्गत कुरघोड्या, कार्यकर्त्यांचा समन्वयाचा अभाव आणि तिकीट वाटपातील नाराजी यामुळे राष्ट्रवादीला काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे बसपा, रासप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले खाते उघडले असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा मात्र दारूण पराभव झाला आहे. आगामी निवडणुकीवर उमटणार पडसाद राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या बारामतीत अन्य पक्षांनी खाते उघडल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या प्रचारामुळे ओबीसी उमेदवारांच्या विजयाला मोठी मदत झाली. या विजयाचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच उमटणार आहेत. सर्वच छोट्या पक्षांनी आतापासूनच ताकतीने तयारी सुरू केल्याने बारामती तालुक्यात आगामी काळात चुरशीच्या निवडणुका पाहायला मिळतील, असे संकेत या निकालातून मिळाले आहेत.