प्रभात वृत्तसेवा सोमेश्वरनगर – बारामतीच्या पश्चिम भागात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडगाव निंबाळकर व पणदरे येथे गावभेट दौरा केला. या दौऱ्यानिमित्त वडगाव निंबाळकर येथील महात्मा फुले चौकात आयोजित बैठकीला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. बैठकीदरम्यान प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपस्थित ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सामाजिक प्रश्न जाणून घेतले. यावेळी प्रा. हाके म्हणाले की, ओबीसी समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष सुरू राहील. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संघटितपणे लढा उभारणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात प्रा. लक्ष्मण हाके यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते विजय आण्णा हिरवे व जय मल्हार क्रांती संघटना, पुणे जिल्हा अध्यक्ष पै. नानासाहेब मदने यांनी केले. प्रमुख उपस्थितीत दौरा प्रमुख बापुराव सोलनकर, किशोर हिंगणे, महेश जाधव, बबनराव भंडलकर, तानाजी गायकवाड यांचा समावेश होता. बैठकीचे प्रास्ताविक बालगंधर्व पुरस्कार विजेते जादूगार शिवम यांनी केले. सूत्रसंचालन ‘होम मिनिस्टर’ फेम आकाश वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुष्कराज गायकवाड यांनी मानले. यावेळी पांडुरंग घळगे, चांगदेव भंडलकर, दिलीप हिरवे, शंकर चव्हाण, नाना लोणकर, कालिदास जाधव, अभिजीत साळवे, लालासो हाके, इकबाल आत्तार, अजित जायपत्रे, गंगाधर आगम, सचिन आगम, विलास बनकर, रघुनाथ घोडके, सुहास होळकर, विकास खिल्लारे आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.