राजगुरुनगर : भगवान महावीर जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधत श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, भारतमाता पूज्य प्रमोद सुधाजी म. सा. चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवदया’ व ‘गोसेवा’ या संकल्पनेवर आधारित महावीर की रोटी या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ व उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रोटी संकलन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. एक रोटी गोमाता के नाम, यही अपना पहला काम या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक घरातून किमान एक रोटी संकलित करून ती गोशाळेतील गायींना अर्पण करणे हा आहे. यावेळी नगरसेवक वैभव घुमटकर, फैज मोमीन, निलेश घुमटकर, कुमार सांडभोर, सागर सातकर, सचिन मधवे, नगरसेविका सुप्रिया घुमटकर, सुप्रिया पिंगळे, ज्योती वाडेकर, कल्पना आढारी, आशा गुंडाळ, माजी अध्यक्ष विजय भन्साळी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा, जैन धर्मार्थ हॉस्पिटलचे अध्यक्ष संतोष बोथरा यांच्यासह अनेक मान्यवर व जैन समाजाचे सदस्य उपस्थित होते. दर रविवारी वाहन फिरणार या उपक्रमांतर्गत दर रविवारी विशेष वाहन शहरातील विविध भागांत फिरणार असून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचेल. नागरिकांनी आपल्या घरातील ताजी भाकरी किंवा चपाती रोटीपात्र मध्ये दान करायची आहे. संकलित रोटी गोशाळेतील गोमातेच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘जीवदया’चा संदेश पुढे न्यायावा, असे आवाहन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ व नवकार ग्रुपचे अध्यक्ष अमर टाटीया यांनी केले आहे.