प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पुस्तक विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांच्या वतीने ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी विजयस्तंभ स्मारकाच्या मागील बाजूस १०० हून अधिक बुक स्टॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, इच्छूक पुस्तक विक्रेत्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या पुस्तक विक्रेत्यांना स्टॉल हवा असेल त्यांनी २५ डिसेंबर २०२५ पर्यंत कोऱ्या कागदावर अर्ज करून स्वतःचे छायाचित्र चिटकवावे. सोबत बुक विक्रेते अथवा प्रकाशनचे नाव असलेले शॉप ॲक्ट, आधार कार्ड आणि मोबाइल नंबर नमूद करून publicationandpublicity@barti.in या ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष बार्टी, येरवडा संकुल येथील पुस्तक विक्री केंद्रात अर्ज पाठवावा. इतर कोणत्याही ठिकाणी किंवा इतर कार्यालयात अर्ज केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. स्टॉलची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. गरज पडल्यास लॉटरी पद्धतीने स्टॉल वाटप केले जातील. एका विक्रेत्यास एकच स्टॉल दिला जाणार असून, हे स्टॉल फक्त पुस्तक विक्रेत्यांसाठीच असणार असल्याने अन्य कोणी अर्ज करू नये, असे आवाहन ‘बार्टी’च्या वतीने करण्यात आले आहे.